Thursday, March 1, 2012

सुभाष बाबाराव दापके

१९८४ च्या फेब्रुवारी महिन्यात माझा विद्यर्थी परिषदेशी संपर्क आला.

त्याच दरम्यान दापके सरांचाही संपर्क आला, पहिली भेट अशी संस्मरणीय झाली असे नाही. पण हळु हळु स्नेह वढत गेला. परिचयाचे रुपांतर ॠणानुबंधात झाले ते कळलेच नाही. सर काल गेले आणि पटकन माझ्या डोळ्या समोरुन एक पट सरत गेला. सरांचे धिप्पड व्यक्तिमत्व, सरांची ऐतिहासिक टी.वी.एस. ५० गाडी, वरुणतीर्थ मैदानाच्या व्यायाम शाळेत व्यायाम करणारे सर, व्यायाम करताना सीटप्स काढताना पाय धरुन मदत करणरे सर, गप्पा मारताना टाळी मागणारे सर, एका विशिष्ठ स्वरात "बरं का" म्हणून विषयाची सुरवात करणारे सर, मिलिंद कौलगुडला किती चढत्या उतरुन आलास विचारणरे सर..... ज्यनि सरांबरओबर अधिक काळ काम केले आहे ते अशा अनेक आठवणी सांगतील...किंवा वाचताना त्यांच्या समोर सरांचे व्यक्तिमत्व नक्कीच उभे रहिले असेल.



तसे सर आताच्या लतूर जिल्ह्यतील अहमद्पुर गावचे, नोकरीच्या निमित्ताने कोल्हापुरला आले आणि कोल्हापुरकर झाले. तसे अनेक जण आले असतील पण सरांच परिचय येथे संपत नाही तर सुरु होतो.सुमारे १९६६च्या दरम्यान सर परिषदेच्या संपर्कात आले. कोल्हापुरात त्या काळात असणारी जातीविषयक समिकरणे पहाता ब्राम्हणेत्तर कार्यकरता मिळणे आणि तो टिकणे सोपे नव्हते. त्यात सर ज्या माहाविद्यालयात शिकवत होते ते कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते रत्नाप्पा कुंभार यांचे, त्यामुळे परिषदेचे काम करणे सोपे नव्हते. एकदा तर रत्नाप्पाअण्णानीं सराना बोलावुन सांगितले की एक तर नोकरी करा किंवा परिषदेचे काम करा. सर्वसामावेशक परिषदेचा चेहरा बनविण्यात सरांचा मोठा सहभाग होता.



१९८४ साली नाशिक येथील प्रांत अधिवेशनात सर प्रदेशाध्यक्ष झाले. प्रा. अनिरुध्द देशापांडे याच्या सारख्या चतुरस्त्र व्यक्तिमत्वा नंतर ही जबाबदारी सोपी नव्हती. पण सरानीं स्वत:ची अशी वेगळी प्रतिमा उभी केली. सरांचे सत्र, भाषणे नेहमी काही तरी वेगळे देणारे असे, त्याच्या भाषणात येणारी उदाहरणे नेहमी थोडी हटके असत. मला अजुनही त्यांचे एक वाक्य आठवते “There is total moral decay “ कुठल्याशा विषयात सगळीकडेच कसे नैतिक अध:पतन झाले आहे या संदर्भातले हे वाक्य सर अनेकदा वापरत.सुमारे ४-५ वर्षे सर प्रदेशाध्यक्ष राहिले.१९९५ साली युती शासनानाच्या काळात सर राज्यपाल नियुक्त आमदार झाले.



दरम्यानच्या काळात सरांचे दिसणे कमी होत गेले. गेली काही वर्षे ते आम्हाला आवाजावरुन ओळखत असत. काळाच्या ओघात भेटण्यातील सातत्य कमी होत गेले. सुमारे २ महिन्या पुर्वी एस. जी. कुलकर्णी सरांकडे सर अम्हा सगळ्याना भेटले. "यारे जर सगळे जण, जरा वेळ काढुन या, भरपुर गप्पा मारु या. नाही तर असे करा आपण शेतावर जेवायचा कार्य़क्रम करु या, सांगा कधी येता?" असे प्रेमाचे अग्रहाचे निमंत्रण सरांनी दिले पण नियतीच्या मनात वेगळेच होते.सुमारे महिन्याभरात सरांचे अचानक वजन कमी होउ लागले.२५ किलो मात्र १५ दिवसात कमी झाले, वैद्यकीय तपासण्या झाल्या आणि निदान कॅन्सरचे झाले, लिव्हरचा कॅन्सर आणि शेवटचा टप्पा. १५ दिवसांपुर्वी आम्ही सगळे जण (सतीश, नंदू, विद्यधर, प्रसन्न, वगैरे) सरांशी गप्पा मारुन आलो, पहाडी असणारा आवाज आता जरा क्षीण झाला होता. सुमारे दीड, दोन तास सर आमच्य्या बरोबर जुन्या आठवणीत रमले होते. बोलताना टाळ्या मागत होते. डॉक्टरानीं ६ महिने ते वर्षाचा वेळ सांगितला होता, परत भेटण्याचे ठरवुन आम्ही बाहेर पडलो ते पुन्हा सरांना न भेटण्यासाठी.....

२९ फेब्रुवरी.....

२९ फेब्रुवरी तारखेत नविन ते काय? लिप इयर आहे, ४ वर्षातून एकदाच येते आणि काही?

माहिती नाही.....

पण माझ्यासाठी मात्र ही एक स्पेशल आहे. अशाच एका २९ फेब्रुवरीला मी एका वेगळ्या प्रवासाला सुरवात केली होती. खरे तर या ग्रुप मधल्या बहुतेकानी हा मार्ग कधी न कधी चोखळला आहेच.

२९ फेब्रुवरी १९९२ चा दिवस अजूनही माझ्या पूर्ण स्मरणात आहे. पहाटे ४च्या सुमारस उठलो. रात्रीचा मुक्काम ३ मार्बल वर होता. पट पट आवरले, तो पर्यंत दादा पाटीलही आवरून तयार झाला होता. धावत पळत मुंबई सेन्ट्रल गाठले, "खरेतर मी तुझ्या बरोबर येणार होतो पण ते शक्य नाही तेव्हा तू एकटाच अहमदाबादला जा." इती दादा...स्टेशनवर (अहमदाबाद) बुकिंग खिडकी पाशी कुणी तरी कार्यकर्ता परिषदेची डायरी घेऊन उभा असेल, तो तुला कार्यालयात घेऊन जाईल आणि आज पासून तुझे कार्यक्षेत्र अहमदाबाद म्हणजे कर्णावती असेल..." पूर्व योजना, पूर्ण योजने प्रमाणे माझे आरक्षाण झाले नव्हते पण दादाने कुठून तरी एजंट कडून तिकीट मिळवले होते.बरोबर रु. २०० दादाने दिले ब्लॅक मनी....

५.४५ झाले गाडी हलली आणि माझा प्रवास सुरु झाला.सहप्रवासी बहुतेक गुजरातीच होते. त्यात एक मोठी कच्छी कुटुम्ब होते. दादर यायच्या आत त्यांनी डबे सोडले होते. कुटुंबातील महिला डब्यातील पदार्थ काढून सर्वांना वाटत होत्या. कानावर सारखे गुजरती संभाषण पडत होते. कधी थोडेसे समजत होते, कधी डोक्यावरून जात होते. आणि याच भाषेवर मला प्रभुत्व मिळवायचे होते. जे सह प्रवासी मला परके वाटत होते मला त्यांच्यातलाच एक बनायचे होते.गाडी वेगाने पळत होती आणि माझे विचारही. खरे तर माझ्या बरोबरीने १०-१२ जण पूर्णवेळ निघाले पण मी एकटाच महाराष्ट्रा बाहेर का? माझ्यात काही जादा गुण आहेत की काही कंमी आहे म्हणून मला गुजरतमधे पाठवले आहे....माझा निभाव लागेल ना? इत्यादी....

वापी, सुरत, बडोदा करत गाडी एकदाची अहमदाबाद्ला पोहोचली. दुपार उलटून गेली होती. उन्हाळा सुरु झाला होता. अहमदाबाद स्टेशनवर उतरलो. वातारणात एक प्रकारचा सुस्तपणा भरला होता. (अनेकदा स्टेशन, स्टॅन्डवर उत्साही वातवरण असते) बुकिंग खिडकी पाशी तिघेजण उभे होते. एकाच्या हातात परिषदेची डायरी. तो होता विजेन्द्र पांडे कर्णावती शाखा सहमंत्री, शहर उपाध्यक्ष म्रुगेशभाई शुक्ल, आणि प्रदेश सह्संगठनमंत्री अतुलभाई कोठारी. म्रुगेशभाईच्या व्हेस्पा १५० वर बसून परिषद कार्यालय गाठले. कांतीलालच्या गाडीवरचा चहा मागवला. येणारी काही वर्षे हाच कडक आणि मीठा चहा मला साथ देणार होता. संध्याकाळी रुद्रेशभाई व्यास (माझ्या आधिपासून विद्यार्थी विस्तारक म्हणून काम करणारा)आणि आरतीबेनची (माझ्या आधिपासून विद्यार्थी विस्तारक म्हणून काम करणारी) ओळख झाली. रात्री म्रुगेशभाई कडे माझे आणि अतुलभाईची भोजन व्यवस्था होती.

पहाटे लवकर उठल्याने आणि दिवसभर प्रवासाने काहीसा क्षीण आला होता. कार्यालयातल्या सतरंजीवर आडवा होऊन कधी झोपलो ते कळलेच नाही.

आज या गोष्टीला २० वर्षे झाली. पण अजूनही काल परवा घडल्या सारखी वाटते. सहज आठवले म्हणून शेअर केले.

Sunday, September 4, 2011

मग यांच्यासाठी लोकपाल कोण?


दि. १५ /०४ रोजी मी मुंबईहून कोल्हापूरला येत होतो..
छत्रपती शिवाजी टर्मिनस वरून दु.२ ची चेन्नई एक्सप्रेस पकडायची होती.
१४ नं. फलाटावर घाई घाईत पोहोचलो, जेवण व्हायचे होते, म्हटले तेथीलच एखाद्या स्टोलवरून काहीतरी घेऊन खाऊ....
प्रत्येकजण इथे लुटायला बसला होता....
१० रु चे व्हेज  sandwich त्यावरील स्टीकर काढून १५ रुपायाला विकत होते. २४ रु. छापील किमत असलेली पेप्सी वगैरेची बाटली बिनधास्त ३० रुपयाला विकत होते.....

६ वाजता पुण्याला पोहोचलो, आता बस पकडून कोल्हापूर गाठायचे तर स्वारगेट वरती लुटणारे विक्रेते हाजर होतेच... किस्सा मागील पानावरून पुढे सुरु होताच...१५ रु. छापील किमतीची पाण्याची बाटली २० रुपयाला.....

बस हायवे वर एका धाब्यावर थांबली. एस. टी. महामंडळाची बस... वाहक, चालकाचे फुकट जेवण, इतरांना चांगलेच महाग पडले होते. सर्व पदार्थ दीडपट किमतीला...
ज्यावर छापील किमत होती तेही २-५ रुपये महाग....... बस रात्री ११ नंतर कोल्हापूरला पोहोचणार असल्याने सर्व प्रवाश्यांना मजबुरीने महाग जेवण, खाणे घेणे भाग होते....

११.४५ वाजता कोल्हापुरात पोहोचलो. रिक्षावाला जवळचे प्रवासी घ्यायला तयार नाही ....१२-१३ रुपये मीटर होणारे अंतरास २५ रुपये मागत होता......

मनात प्रश्न आला "दिवसभरात मला भेटलेले हे सर्व भ्रष्टाचारी नाहीत का?" अवैध मार्गाने संपत्ती मिळवणे म्हणजे भ्रष्टाचार." ही व्याख्या बरोबर असेल तर इथे सर्वांनाच ती लागू पडते..
मग यांच्यासाठी लोकपाल कोण?

Friday, August 19, 2011

"भाऊ"


दि.२७ जुलै २०११ रात्री १०.३० वा. बाहेर जाउन आलो आणि झोपण्या पूर्वी काही तरी वाचायचे म्हणून रुजुता दिवेकरचे पुस्तक ’ डोन्ट लूज युवर माईन्ड लूज युवर वेट’ समोर धरले. डाएट, वजन कमी करणे या विषयावरचे पुस्तक, वजन, जाडी कमी करण्यासाठी फ़ार अतिरेक करण्याची गरज नाही, कोणीही हे सहज करू शकतो असे काहीसे लेखिकेने लिहिले होते. मनात विचार आला, भाऊने हे पुस्तक वाचले पाहिजे.थोडासा व्यायाम आणि जरासे पथ्य जर तो पाळू शकला तर? असा विचार मनात घोळवत वाचत असतानाच फ़ोन वाजला. बहुदा १०.५० वाजले असावेत. यावेळी कुणाचा फ़ोन? विचार करत उचलला तर भाऊ बांबवडेकर समोरु बोलत होता, "प्रशांत भाऊ गेला!" योगायोग काय असतो, काही क्षणा पूर्वी मी ज्याच्या विषयी विचार करत होतो, त्यानेच या जगाचा निरोप घेतला होता.
"अनेक फुले फुलती, फुलोनिया सुकोनि जाती परंतू त्यची गणती कोणी ठेविली असे?" या जगात किड्या-मकोड्या सारखे अनेकजण जन्मला येतात आणि मरतात, त्यांचा जीवन प्रवास हा जन्म - शिक्षण - नोकरी - विवाह - मुले/मुली - त्यांची शिक्षणे - लग्ने - नातवंडे या क्रमात कधीतरी म्रुत्यु या पेक्षा वेगळा असा नसतोच. भाऊ या चाकोरीत बसणारा कधीच नव्हता. तो एक मनस्वी होता.त्याच्या विषयी काय आणि कसे लिहावे, सुरवात कोठून करवी ते समजत नाही.
भाऊचा एक पैलू म्हणजे त्याचा जनसंग्रह. भाऊचे स्वत:चे मित्र भरपूर होते पण माझे मित्रही त्याचे मित्र होते. बाळसाहेब मंगेशकर, सुनिल शेंडे सारख्या दिग्गजा पासून त्याच मित्र संग्रह होता तो चैतन्य़ महाराज देगलूरकर.....असे अनेकजण. माझे पुण्यातले परिषदेचे मित्र हे त्याचे मित्र होऊन गेले होते. माणसाला लक्षात ठेवण्याची त्याची विषेशता होती. मी अहमदाबाद्ला असताना, एकदा आई आणि अलका तिकडे आल्या होत्या. पुण्यात त्यानां गाडीवर सोडायला माझा मित्र रवी शिंगणापूरकर आला होता. तो आणि भाऊ त्यावेळी पहिल्यांदा भेटले असावेत, पण तेव्हा पासून भाऊ रवीला कधीच विसरला नाही. माझे कोल्हापुरातले मित्रही त्याचे मित्र झाले होते. आणि पहिल्या भेटीतच तो त्यांना उम्या, विज्या म्हणायला लागला. नेहमी भेटल्यावर तो आवर्जून त्यांची चौकशी करायचा.
भाऊ आणि त्याचे खाद्यजीवन या वर न लिहिता हा लेख पुरा होउ शकत नाही."चवीने खाणार त्याला देव देणार" ही म्हण भाऊच्या बबतीत शब्दश: खरी होती. अनेकदा तो कोल्हपूरला यायचा, सायंकाळी आमचा परिपाठ कोल्हापुरच्या खाद्य संस्क्रुतीचा अभ्यास करण्याचा, रंकाळ्यावर जायचे. सर्व गाड्यांवरील पदार्थांचे परिक्षण करायचे, अंबाई टॅंक येथे गोविंदभाऊकडे मग कॉफ़ी पान करायचे आणि रात्री दही भात खायचा आणि झोपायचे.मी पुण्यात आल्यावर त्याने मला पुण्यतली खाद्यस्थानांची सफर घडवली, अप्पाची खिचडी-काकडी. रविवारी सकाळी स्पेशल संडे-पॅटीस, चितळ्यांकडील अंबा बर्फ़ी, मोतिचूर लाडू, बूर्ज्वाची एक्सप्रेसो कॉफ़ी यादी मारुतीच्या शेपटी सारखी वाढतच जाईल.एकदा असाच तो धारवडला सप्त्याला जाऊन परत पुण्यला चालला होता. माझेही पुण्यात काम असल्याने मी पण त्याच्या बरोबर निघलो होतो. संध्याकाळी आम्ही कोल्हापूर सोडले आणि भाऊला इडली खायची लहर आली. वाटेतल्या सर्व हॉटेल मधे शोध घेत व्हाया इसलामपूर आम्ही कराडला संगम हॉटेल पर्यंत पोहोचलो. संगम मधेही इडली काही मिळली नाही पण वेटर म्हणाला समोरच्या साईराज मधे कदचित मिळू शकेल, झाले आमची वरात साईराज मधे दाखल झाली. अप्पा- साईराजचा मालक खाशा-महेमानासाठी स्वत:हून हाजर झाला, भाऊच्या स्वभावा प्रमाणे त्याच्याशी दोस्ती झाली आणि त्याने इडली ऐवजी गरमा गरम चापती, लसणाची मस्त चटणी, भाजी म्हणत पूर्ण जेवण जेवायला लावले. ५ मिनिटात इडली खाउन निघयचे ठरवून गेलेलो आम्ही चांगले दीड तास थांबलो. आजही साईराजचा अप्पा माझा मित्र आहे.त्या नंतर अनेक वेळा मी तिथे जेवलो, नाश्ता केला पण निमित्त मात्र भाऊ होता.
साहित्य हा भाऊच्या व्यसंगाचा विषय होता. तसेही त्याचे शिक्षण मराठी विषयात झालेले होते. प्रचंड वाचन असे. एकदा मी असाच शांता शेळकेंचे गीत "तोच चंद्रमा नभात" गुणगुणत होतो, लगेचच त्याने त्या गीताची जन्म कथा सांगीतली. उत्तर रामचरितातला तो श्लोक ज्यात राम सीतेला म्हणतो पूर्वी सारखे दिवस राहिले नाहीत, बाबूजीं आणि ग.दि.मा. यांच्यात त्या काळात निर्माण झालेला तणाव आणि शांता शेळकेंनी तो श्लोक ऐकताच रचलेले गीत म्हणजेच "तोच चंद्रमा नभात". भाऊ स्वत: कवीही होता एकदा असेच सायंकाळी उशीरा रंकाळ्यात पाय सोडून आम्ही दोघे बसले होतो. पाठीमागे शालीनी पॅलेसचा कॅन्हास होता आणि त्याने मला स्वरचित कविता "दिन केवड्याची पात, सुरम्याची गर्द रात, काळ्या कुटील अभाळी कुणी ओलं गातं......." पु.ल., व.पु. बहुतेक सर्व नामंकीत साहित्तिकांचे साहित्य त्याने वाचले होते.
संगीत हा देखिल भाऊचा एक पैलू होता. त्याला संगीताचा कान होता. स्वत: तो पेटी वाजवत गाणी म्हणत असे. कधी कधी वर्षा सहलीला बहेर पडून तो पन्हाळा, महबळेश्वर येथे जात असे, तेव्हा हमखास त्याच्या बरोबर पेटी असायची. त्याच्या मोबाईलची कॉलर ट्युन हे त्याच्या संगीत प्रेमाचे उदाहरण असावे. पं. भीमसेन जोशींचे एक गाणे ही त्याची मोबाईलची कॉलर ट्युन होती.कॅसेट, विविध प्रकारच्या गाण्याच्या सीडीजचे त्याचे कलेक्शन खूप मोठे होते.
भाऊचा स्वत:चा संसार नव्हता पण तो इतरांच्या संसाराचा एक भाग नक्कीच होता. त्याच्या बहुतेक सर्व वहिन्याना पहिल्यांदा आल्या नंतर त्याने साडी किंवा तत्सम वस्तु देऊन त्यांचा मान केला आहे. सर्व भाचे, पुतण्या, पुतणे यांचे भाऊने घेतलेले फोटो त्याच्या संग्रही होते.सर्व वहिन्यांची त्याची खास दोस्ती होती. प्रत्येकीची स्वयंपाकाची विषेशता त्याला माहिती होती. कोल्हापुरात आला की आई कडून अवर्जून हळद, मिरचीचे लोंणचे, लाल मिरचीचा ठेचा इत्यदी हक्काने तो घेऊन जायचा.
गेली काही वर्षे तो मधुमेह, उच्च रक्तचापा सारख्या आजारने त्रस्त होता.भाऊचे भाऊपण संपत चालले होते. त्याचा जिंदादिली अटत चालली होती. मनाच्या वेगाने शरीर पळत नव्हते. बोलता बोलता त्याने अनेकाना "आता बस झाले, पूर्ण विरम द्यावा " अशी इच्छा व्यक्त केली होती.मला वाटते भाऊ खरोखरच स्म्रुती रूपाने आपल्यात राहिल. त्याला विसरणे शक्य नाही. भाऊ विषयी सांगता येण्य़ा सारखे खूप आहे. पण इथे विराम घेणे आवश्यक आहे, नाही तर कधीच हे संपणार नाही. आज त्याचा १० वा दिवस, माझ्या तर्फे हीच आदरांजली.
कोल्हापूर
दि. ५ .०८.२०११

३-४ महिन्या पूर्वी पुण्यात गेलो असताना भाऊचा मोबाइल्वर काढलेला फोटो